सरकारला दिलेल्या मुदतीनुसार लिंगायत पंचमसाली समाजाला 19 डिसेंबरच्या आत 2 ए आरक्षण द्यावे. अन्यथा 22 डिसेंबर रोजी सुवर्णसौधसमोर 25 लाख पंचमसाली बांधवांचा विराट पंचमशक्ती मेळावा घेऊन आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा कुडलसंगम पिठाचे श्री बसवजयमृत्युंजय स्वामी यांनी आज दिला.

बेळगावातील गांधी भवन येथे आज सोमवारी पंचमसाली आरक्षणासाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी कुडलसंगम पिठाचे श्री बसवजयमृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली. त्यात पंचमसाली समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आर या पार लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री ए. बी. पाटील, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, माजी केंद्रीय मंत्री व विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री शशिकांत नाईक आदी पंचमसाली नेते उपस्थित होते. यावेळी स्वामीजींसह पंचमसाली नेत्यांनी आरक्षणासाठीच्या लढ्यावर पुढील रणनीती काय असावी यावर विविध सूचना केल्या.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना बसवजय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले, दोन वर्षांपासून आम्ही सातत्याने आरक्षणासाठी लढा देत आहोत. आज आम्ही सरकारला त्याची आठवण करून देण्यासाठी बैठक घेतली आहे. त्यामुळे सरकारने विलंब न लावता आरक्षण द्यावे. सरकारने कालमर्यादेत आरक्षण दिल्यास त्यांचा सन्मान करू, असे ते म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनावेळी होणाऱ्या विराट पंचमसाली मेळाव्यात अन्नदानासाठी दावणगेरे येथून 1 हजार क्विंटल तांदूळ पाठविण्यात येणार आहे. हा आमचा करा किंवा मरोचा अंतिम लढा आहे, आम्ही 19 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत वाट पाहू. अन्यथा आम्ही पदयात्रेने सौंदत्तीपासून सुवर्णसौधवर धडक देऊ, असा इशारा बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी दिला.
एकंदर, २-ए आरक्षणासाठी आता अंतिम लढा देण्यासाठी पंचमसाली समाज एकवटला आहे. राज्य सरकार यावर आता काय भूमिका घेते हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.


Recent Comments