बेळगावातील मराठी सीमावासियांच्या भेट घेऊन विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्राचे दोन मंत्री येणार असल्याच्या बातमीने कन्नडिगांचे धाबे दणाणले आहेत. या भेटीविरोध आता पुन्हा एका नवीन कन्नड संघटनेने चन्नम्मा चौकात आज बोंब मारत लोटांगण आंदोलन केले.
महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई ३ डिसेंबरला बेळगावात येणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्याने बेळगावात परिस्थिती बिघडेल, सध्या त्यांच्या दौऱयासाठो शहरात पूरक वातावरण नाही असा सूर आळवत कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सने पत्र पाठवले होते. त्यामुळे उद्या मंगळवारी महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक एकीकरण समिती नामक बेंगळूर येथील एका नव्याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज चन्नम्मा चौकात शंखध्वनी करत लोटांगण आंदोलन करून वाहतूक ठप्प करत नागरिकांना वेठीस धरले.

यावेळी बोलताना कर्नाटक एकीकरण समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. बेळगावात कन्नड आणि मराठी भाषिक गुण्यागोविंदाने रहात आहेत, अशात महाराष्ट्राचे मंत्री येऊन येथील दोन्ही भाषिकांतील संबंध बिघडवतील. त्यामुळे त्यांना बेळगावात येण्यास प्रतिबंध करावा.
एका महिला कार्यकर्तीने सांगितले की, कर्नाटकात आमचा झेंडा फडकवणे गुन्हा आहे का? पोलीस आणि सरकारी अधिकारी कन्नड भाषिकांच्याच विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप करून अशी सावत्रपणाची वागणूक देऊ नये अशी मागणी केली.

आंदोलकांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून लोटांगण आंदोलन केले. ऐन सकाळी नोकरी-व्यवसायाला जाण्याच्या वेळेसच केलेल्या या आंदोलनामुळे चन्नम्मा चौकात सर्वच वाहनधारकांना मनस्ताप सोसावा लागला. उठसुठ सीमाप्रश्नावरून आंदोलन करून फुक्कटची प्रसिद्धी मिळवण्याच्या कन्नड संघटनांच्या या कोल्हेकुईचा बेळगावातील सर्वच भाषिकांनी निषेध केला आहे.


Recent Comments