Belagavi

जतच्या कन्नडिगांची बेळगावात पत्रकार परिषद : कर्नाटकात सामावून घेण्याची मागणी

Share

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पहिल्यांदाच आमच्या बाजूने बोलले आहेत. त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करत असल्याचे जत तालुका कन्नड संघर्ष समितीचे सोमलिंग चौधरी आणि गौडेश मोडल्ली यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील जत येथील कन्नडिगांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे प्रदेशाध्यक्ष भीमा शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. 50 वर्षे झाली आणि महाराष्ट्र सरकार आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. म्हैसाळ सिंचन योजना कार्यान्वित झालेली नाही. सीमेवरील कन्नड भागातील रस्ते खराब झाले आहेत. प्रत्येक 200 मुलांमागे एक कन्नड शिक्षक आहे. 215 कन्नड शाळांमध्ये सुविधा नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सुविधा मिळत नाहीत. आम्ही महाराष्ट्रात नाही, कर्नाटकात सामील होऊ. आम्हाला विजापूरचे आमदार एम. बी. पाटील यांच्यामुळे पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यांचे आभारी आहोत. महाराष्ट्र सीमेवरून कर्नाटकातील विजापूर जिल्हा सीमेवर येऊन पाणी घेत आहोत असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भीमाशंकर पाटील यांनी यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात गरळ ओकली. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील कन्नडिगांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे बसवराज बोम्मई यांना महाराष्ट्राच्या जत तालुक्यात बोलावू. जतमध्ये त्यांना आम्ही ‘दक्षिण पठेश्वर’ या उपाधीने सन्मानित करू. हा पुरस्कार कर्नाटक नवनिर्माण सेनेतर्फे दिला जातो. याबाबत आम्ही यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे असे ते म्हणाले.

सीमाप्रश्नाच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीमावादावर सुप्रीम कोर्टात काय होणार, याची आम्हाला चिंता आहे. सीमाभागाचा विकास, सीमाभागातील समस्यांना प्रतिसाद देण्याचे काम शासनाच्या विविध विभागांकडून झालेले नाही. सीमा कन्नडिगांच्या समस्यांना सीमा विकास प्राधिकरणाकडून प्रतिसाद मिळत नाही. उद्या सुप्रीम कोर्टात विरुद्ध निर्णय झाला तर, होणाऱ्या परिणामांना राज्य सरकारच जबाबदार असेल. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना उचलून बेळगावातून हाकलून द्यावे. जन्म दिलेल्या आईची फसवणूक करण्याचे काम आमच्या लोकप्रतिनिधींनी करू नये अशी दर्पोक्ती मारत बेळगावातील मराठी भाषिकांची रोहिंग्यांशी तुलना करत या रोहिंग्यांना हुसकावून लावावे, अशी मागणी त्याने केली.

महाराष्ट्राच्या दोन सीमाभाग समन्वयक मंत्र्यांनी ३ डिसेंबरला बेळगावला येणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावात येऊ देऊ नये. विधिमंडळ अधिवेशनावेळी म. ए. समिती एक भव्य मेळावा घेण्याचा विचार करत आहेत. या महामेळाव्याला परवानगी देऊ नये. अन्यथा आम्हीही मुसळ घेऊन आंदोलन करू. आम्ही जतच्या कन्नडिगांसोबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची या आठवड्यात भेट घेणार असल्याचे भीमा शंकर पाटील यांनी सांगितले.

एकूणच, जतचे कन्नडिग कर्नाटकात सामील होण्याच्या मार्गावर आहेत असा दावा करण्यात आला आहे. यावर कर्नाटक सरकार सुप्रीम कोर्टात कशाप्रकारे लढणार, हे पाहावे लागेल.

Tags:

add-us-to-karnataka-jath-people/