बेळगाव तालुक्यातील सुपीक जमिनीचे संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या रिंग रोडच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. या रिंग रोडच्या विरोधातला मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज बेळगावात झालेल्या तालुका समिती आणि अन्य संघटनांच्या बैठकीत करण्यात आला.
व्हॉइस : होय, बेळगाव तालुक्यातील हजारो एकर सुपीक जमीन संपादित करून त्यावर रिंग रॊड करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. मात्र त्यामुळे सुपीक जमीन हातची जाऊन शेतकरी कंगाल होणार आहे. त्यामुळे रिंग रोडला बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने या भूसंपादनाच्या विरोधात लढा पुकारला आहे. या लढ्यात राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संघटनांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज बेळगावातील मराठा मंदिर सभागृहात विविध संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वानी एकत्र येऊन रिंग रोडच्या विरोधातील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, रिंग रोडच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा डाव काहींनी रचला आहे. तो हाणून पाडण्यासाठी सर्वानी मतभेद, राजकारण, गट-तट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. येत्या २८ नोव्हेंबरला भूसंपादनाच्या विरोधात पुकारलेल्या मोर्चात सर्वानी सहभागी होऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडूया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले, नियोजित रिंग रोडच्या आसपास कोणकोणत्या आमदारांनी जमिनी घेऊन ठेवा आहेत याचा आपण अभ्यास करायला हवा. रिंग रोड झाल्यावर त्यांचा फायदा होणार असल्याने सरकार दरबारी प्रभाव टाकून विकासाच्या नावाखाली रिंग रोड करून स्वार्थ साधण्याचा त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी आपण सर्वानी एकत्र आले पाहिजे. आपण अन्नदाता आहोत, त्यामुळे कोणाचीही भीड न बाळगता, दबावाखाली न येता हा लढा देऊन यशस्वी करूया. युवकांनाही सोबत घेऊन लढ्यात उतरूया, या लढ्यात श्रीराम सेना हिंदुस्थान एक पाऊल पुढे राहील अशी ग्वाही मी देतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी इतर नेत्यांनी गावोगावी रिंग रोडच्या विरोधात जनजागृती करून सर्व शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
बैठकीला ऍड. राजाभाऊ पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. एम. जी. पाटील, मनोज पावशे, एस. एल. चौगुले, सरस्वती पाटील यांच्यासह बेळगावतालुक्यातील विविध गावचे शेतकरी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments