Belagavi

जुन्या पेन्शन स्कीमसाठी बेळगावात सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार !

Share

नवीन एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागून करण्याच्या मागणीसाठी बेळगावात सरकारी कर्मचाऱ्यांनी आज एल्गार पुकारला. ‘करो या मरो’चा नारा देत सुमारे 10,000 एनपीएस कर्मचाऱ्यांनीजुन्या पेन्शन व्यवस्थेसाठी भव्य जनजागृती मोर्चा काढला.

होय, 2006 पासून लागू केलेली NPS योजना रद्द करावी, जुनी ओपीएस योजनाच पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी येत्या 19 डिसेंबरपासून बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे ‘करो या मरो’ धर्तीवर बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज बेळगावात भव्य रॅली काढली. सुमारे 10 हजार एनपीएस कर्मचाऱ्यांनी आज, रविवारी बेळगावातील किल्ला परिसरातील श्री दुर्गादेवी मंदिरापासून संकल्पयात्रा काढत शहरात जनजागृती केली. यावेळी मोर्चेकरी सरकारी कर्मचाऱ्यांनी, ‘गो बॅक एनपीएस, रिस्टोअर ओपीएस”, “स्क्रॅप एनपीएस,रिस्टोअर ओपीएस”, “एक-दो, एक-दो, एनपीएस फेक दो” अशा मजकुराचे फलक हाती घेऊन तशा घोषणाही दिल्या. निळे टीशर्ट परिधान करून कर्मचाऱ्यांनी मोर्चात भाग घेतला.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना चिक्कोडी जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष सिद्धराम लोकन्नवर यांनी सांगितले की, बेळगाव आणि चिक्कोडी येथील सुमारे 10 हजार एनपीएस कर्मचाऱ्यांनी आज बेळगावातील भुईकोट किल्ल्यातील श्री दुर्गादेवी मंदिरापासून संकल्पयात्रा काढली आहे. 19 डिसेंबर रोजी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये एनपीएसच्या विरोधात ‘करो या मरो’ धर्तीवर सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात येत आहे. 2006 पासून लागू केलेली एनपीएस योजना रद्द करावी. एनपीएस रद्द करून कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी ओपीएस लागू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

एनपीएस योजना 1 एप्रिल 2006 पासून लागू झालीय, त्यामुळे निवृत्तीनंतर किंवा अपघाती मृत्यूमुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना कसलीही मदत न मिळत ते दिवाळखोर बनत आहेत. बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या सत्याग्रहापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. एनपीएस रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ही संकल्पयात्रा काढली जात असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी सांगितले.

बेळगावातील किल्ला तलावाजवळील अशोका चौक, आरटीओ चौक, राणी चन्नम्मा चौकमार्गे फिरून सरदार्स हायस्कूल मैदानावर या जनजागृती मोर्चाची सांगता झाली. बेळगाव आणि चिक्कोडी विभागातील विविध सरकारी खात्यांमधील सुमारे 10,000 कर्मचारी यात सहभागी झाले होते.

Tags:

scrap-nps-restore-ops/