कर्नाटकात भाजपच्या जनसंकल्प यात्रांना अभूतपूर्व समर्थन मिळत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना चांगले काम करूनही काँग्रेसमध्ये किंमत मिळत नाही. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी आमच्या पक्षाच्या तत्त्वज्ञानाशी सहमत होऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहेत असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या उपस्थितीत बेंगळुरूमधील मल्लेश्वरम येथील भाजप कार्यालयात माजी खासदार शशिकुमार आणि मुद्द हनुमेगौडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोम्मई आणि कटील यांनी पक्षाची शाल आणि झेंडे देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी केपीसीसी सदस्य व्यंकटाचल, माजी आयएएस अधिकारी अनिल कुमार, म्हैसूरचे रमेश मुनिअप्पा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. रमेश मुनिअप्पा हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे विशेष कर्तव्य अधिकारी होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कर्नाटकचे राजकारण नवे वळण घेत आहे. गेल्या दहा वर्षांत खूप काही बदलले आहे. काँग्रेस आत्मविश्वास आणि सत्ताही गमावत आहे. आता काँग्रेस लोकप्रिय नाही. बहुतांश मंत्री पराभूत झाले. या आधी काँग्रेसने मागच्या दाराने सत्ता मिळवली होती. पण जेडीएससोबत युती सरकारचा प्रयोग फसला. नंतर भाजप सत्तेवर आला आणि लोकमान्यता मिळाली. संपूर्ण चित्र भाजपच्या बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोम्मई पुढे म्हणाले, मुद्द हनुमेगौडा एक सज्जन राजकारणी आहेत. त्यांच्या पक्षात येण्याने आम्हाला मोठे बळ मिळाले आहे. चित्रपट अभिनेते शशीकुमार आमच्यात होते. आता ते आमच्याकडे परत आले आहेत. आमचे घर सुरक्षित असल्याचे सांगून शशीकुमार परतले आहेत. शशीकुमार यांच्या समावेशामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढली आहे. अनिल कुमार हे लोकप्रिय आयएएस अधिकारी होते. आमच्यात अनेक वेळा तात्विक चर्चा झाली. अनिल कुमार यांच्या पक्षात येण्यामुळे एससी समुदायाला आणि मूलभूत राजकारणाला चांगली दिशा मिळाल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
मंत्री डॉ. अश्वत्थ नारायण, एस. टी. सोमशेखर, गोविंद कारजोळ, राज्यसभा सदस्य जगेश, विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, सी. पी. योगेश्वर, आमदार मसाले जयराम, प्रदेश भाजप संघटन सचिव राजेश यावेळी उपस्थित होते.


Recent Comments