सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून सातत्याने लिखाण करणे कठीण आहे. हि एक मोठी तपश्चर्या असून १९९९ सालापासून आजतागायत याच तत्वावर पी रामय्या यांनी सातत्याने सत्यपरिस्थितीवर आधारित वार्तांकन केले आहे, सत्यपरिस्थीतीशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वरिष्ठ पत्रकार पी रामय्या यांचे कौतुक केले.
बेंगळुरू येथील गांधी भवन येथे अभिमानी प्रकाशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ पत्रकार पी रामय्या यांच्या अनुभव कथनावर आधारित ‘नानू हिंदू रामय्या’ या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती तर्कशुद्ध पद्धतीने लिखाण करत असेल आणि आपले लिखाण प्रकाशित करत असेल तर त्यासाठी संयमाची आवश्यकता अधिक आहे.

केवळ संयम नाही तर परिणामाला देखील सामोरे जाण्याची शक्ती लेखकांमध्ये असणे आवश्यक आहे. हातात लेखणी घेतल्यानंतर विचार हे लेखकाचे मित्र असतात. आणि याच लेखणीतून शब्दरूपी धन बाहेर येते. याचा अनुभव प्रत्येक पत्रकाराने घेतला आहे. पी रामय्या हे देखील अशाच पत्रकारांपैकी एक असून त्यांचे सत्यपरिस्थितीवरील लेखन हे आजच्या पिढीसाठी महत्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पी रामय्या यांनी राजकारण्यांच्या दोन पिढ्या आणि पत्रकारांच्या तीन पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांचे बोलण्यावरील नियंत्रण, उत्कंठावर्धक लेखन, त्यांच्या लेखनशैलीमुळे त्यांना मिळालेले पुरस्कार, आणि त्यांचे आज प्रकाशित झालेले पुस्तक.. या पुस्तकातून त्यांनी त्यांची धर्माविषयीची आसक्ती, धर्मनिष्ठा दाखवून दिली आहे. पी रामय्या यांच्यासारखे लेखक, व्यक्ती हे क्वचित समाजात आढळतात. व्यक्तिमत्व आणि विचार न बदलता सौहार्दपूर्ण नाते जपणे हा त्यांचा विशेष गुणधर्म आहे. आज पत्रकारांची संख्या वाढली आहे. पण प्रत्येकालाच आज आपण पत्रकार म्हणू शकत नाही, पी. रामय्या यांच्यासारखे काही दुर्मिळ पत्रकार आजतागायत समाजासाठी लेखणी झिजवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमास गांधी स्मारक निधी अध्यक्ष वोडे पी कृष्ण, लेखक पी रामय्या, अभिमानी प्रकाशनाचे टी वेंकटेश, वरिष्ठ पत्रकार हुणसवाडी राजन, माध्यम अकादमीचे अध्यक्ष सदाशिव शेणई, कार्यकारी पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूरु, बेंगळुरू प्रेस क्लबचे अध्यक्ष श्रीधर, वार्ता विभागाचे निवृत्त सहसंचालक एच बी दिनेश आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments