hubali

एससी, एसटी आरक्षण वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णयः माजी मुख्यमंत्री शेट्टर

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हे कौतुकास्पद आहे असे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले.

श्री महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त हुबळी शहरातील ग्लास हाऊस येथील वाल्मिकींच्या पुतळ्याला आज रविवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अनुसूचित जातींना 15% वरून 17% आणि अनुसूचित जमातींना 3% वरून 7 % पर्यंत आरक्षण वाढविण्याचा सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण वाढ देण्याची मागणी होत होती. त्यासाठी न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालाच्या अमलबजावणीची मागणी वाढली होती. पण ती मागील सरकारने पूर्ण केली नाही. मात्र भाजप सरकारने आरक्षणात वाढ केली आहे.

भाजप कार्यकारिणी समितीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, बीएस येडियुरप्पा आणि इतरांनी एकमताने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करून आरक्षण वाढविण्याचे आवाहन कार्यकारिणीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केले होते असे त्यांनी सांगितले.

रामायणाशिवाय वाल्मिकी नाही. म्हणूनच रामाचे आदर्श तत्वज्ञान, व्यक्तिमत्व आणि प्रतिमा जगाला दाखवण्याचे काम महात्मा श्री महर्षी वाल्मिकींनी केले. आज त्यांची जयंती साजरी होत असून श्री वाल्मिकींचा सामाजिक संदेश अंमलात आणून त्यांना गौरव देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags:

hubli jagadish shettar