Banglore

मुख्यमंत्र्यांकडून सर्वाना वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा

Share

परिवर्तनाचे प्रणेते, महान मानवतावादी, महान ग्रंथ रामायणाचे लेखक, संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शक ठरणारे महर्षी वाल्मिकी यांची जयंती आम्ही अतिशय भव्य आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करत आहोत, सर्वांना वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बंगळुरू येथील आमदार भवनाच्या आवारात आज, रविवारी महर्षी वाल्मिकींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री बोम्मई यांनी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन केले. महर्षी वाल्मिकींना अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, गुलबर्गा येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या सरकारने शासकीय पातळीवर वाल्मिकी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी श्रीरामुलू, गोविंद कारजोळ आणि आम्ही सगळे मंत्रीमंडळात होतो. तेव्हापासून आपण महर्षी वाल्मिकी जयंती अतिशय अर्थपूर्णपणे साजरी करत आहोत. त्याशिवाय वाल्मिकींची तत्वे आणि आदर्श जीवनात अंगीकारण्यासाठी सरकार आणि समाजाला आवश्यक असलेले सर्व कार्यक्रम आम्ही आखत आहोत. वाल्मिकींचे रामायण हे संपूर्ण विश्वातील 10 महान धर्मग्रंथांपैकी एक आहे.

महान धर्मग्रंथांमध्ये हा सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे. याद्वारे वाल्मिकींनी प्रत्येकाला जीवनाचे सार आणि जीवनपद्धती सांगितली आहे. त्यातील सगळेच भाग आजही अर्थपूर्ण आणि अनुकरणीय आहेत. मुख्यमंत्री या नात्याने वाल्मिकी यांची जीवनसूत्रे आपल्या प्रशासनात रुजवू, असे ते म्हणाले.

सर्व अत्याचारित एससी आणि एसटी जमातींना स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी स्वाभिमान आणि समान संधी देण्यासाठी सरकार जे काही करायचे आहे त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही ते करू. वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा असे बोम्मई यांनी सांगितले.

Tags:

valmiki jayanti cm bommai