Chikkodi

मदतीच्या बहाण्याने एटीएम पासवर्ड घेऊन फसवणूक : एकाला अटक

Share

मदतीच्या बहाण्याने महिलेकडून तिचा एटीएम पासवर्ड मिळवून तिच्या बँक खात्यातून 37,500 रुपये काढून लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील 30 वर्षीय अमोल दिलीप सकटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिक्कोडी तालुक्यातील हालट्टी गावातील विजया राणाप्पा ढाले या 3 सप्टेंबर रोजी एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्या असता त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने अमोल सकटे याने त्यांचा पासवर्ड घेऊन त्यांच्या खात्यातील 37,500 रुपये काढून घेतले होते. विजया ढाले यांनी याबाबत फसवणूक करून आपल्या खात्यावरून पैसे काढल्याबाबत चिक्कोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास करून आरोपीचा शोध लावला. त्याने अशाप्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपीने लोकांकडून मिळवलेली एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. अथणी, गोकाक, निपाणी, चिक्कोडी, बागलकोट आणि महाराष्ट्र राज्यातील इतर अनेक ठिकाणी त्याने असेच 51 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिक्कोडी सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय यमनाप्पा मांग, कर्मचारी आर. एल. शीलन्नवर, एम. पी. सत्तीगेरी, एस. पी. गलगली यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल चिक्कोडी पोलिसांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.

Tags: