Banglore

कर्नाटक शिल्पकला अकादमीचा अभिनव उपक्रम

Share

कर्नाटक हे कला, साहित्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील अनेक मंदिरे, लेणी आणि कलाकृती ही शिल्पकलेची उत्तम उदाहरणे आहेत. कर्नाटकाच्या साहित्य-संस्कृतीबरोबरच शिल्पकला विकसित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत कर्नाटक शिल्पकला अकादमीचे अध्यक्ष वीरण्णा अर्कसाली यांनी व्यक्त केले

कर्नाटक शिल्पकला अकादमीच्या विद्यमाने रविवारी कुमार गंधर्व कला मंदिरात २०२१ साचा पुरस्कार वितरण सोहळा तसेच १७ वे वार्षिक शिल्पकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून वीरण्णा अर्कसाली बोलत होते. कर्नाटक शिल्पकला अकादमी प्रशिक्षणाद्वारे उत्तम शिल्पकार तयार करण्याचे उद्दिष्ट कर्नाटक शिल्पकला अकादमी जपत असून कर्नाटकातील शिल्पकलेचा कालखंड आणि शिल्पकलेची सद्यस्थिती कोणत्या मार्गाने विकसित झाली आहे, याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी कलबुर्गी जिल्ह्यातील बाबूराव एच, उडुपी जिल्ह्यातील नरेश नायक, म्हैसूर जिल्ह्यातील सुमन बी., एस. वेणुगोपाल, शिमोगा जिल्ह्यातील अजेय गजानन, बंगळुरूचे विनय कुमार एस., विजापूर जिल्ह्यातील मौनेष आचार यांना १७ वे वार्षिक शिल्प प्रदर्शन पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

तसेच उडुपी जिल्ह्यातील रत्नाकर एस गुडिगार, बळ्ळारी जिल्ह्यातील डॉ. पी. मुनिरत्नचारी, बागलकोट जिल्ह्यातील नागलिंगप्पा गंगाप्पा गंगूर, कलबुर्गी जिल्ह्यातील मान्यय ना. बडिगेर, बेंगळूर येथील बी सी शिवकुमार यांनाही २०२१ सालच्या प्रशस्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे आर चंद्रशेखर यांनी केले. यावेळी विविध शिल्पकारांच्या सत्कारही करण्यात आला. शिल्पकला संस्कृती पुढील पिढीसाठी जतन आणि विकसित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रदर्शनात विविध धातू, दगड आणि मातीच्या शिल्पकृतींचा समावेश होता.

यावेळी कर्नाटक साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षा प्रा. मालती पट्टनशेट्टी, कन्नड आणि संस्कृती विभागाचे सहसंचालक बसवराज हुगार, जमखंडी येथील ज्येष्ठ कलाकार विजय शिंधुर, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, म्हैसूर राम सन्स कला प्रतिष्ठानचे सचिव आर.जी. सिंग, डॉ. सुनंदा, मनोहर काळप्पा पत्तार आणि कलाप्रेमी उपस्थित होते.

Tags:

EVENT