गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे बेळगावात आता जीर्ण घरे, भिंती कोसळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. भारत नगर, शहापूर येथील मुख्य रस्ता बाजार रोडवरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळीच्या उत्तरेकडील भिंत आज कोसळली. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही
बेळगाव जिल्ह्यात रविवारपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. संततधार वृष्टी सुरूच आहे. त्यातच अनेक घरांची पडझड होऊ लागली आहे. काल, रविवारी सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात राहत्या घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत गंगव्वा रामण्णा मुलीमनी या महिलेचे नाव आहे. त्या घटनेनंतर रविवारी रात्री वाजण्याच्या सुमारास भारतनगर येथे भिंत कोसळल्याची ही घटना घडली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही.
या घटनेबाबत स्थानिक महिलांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सुमारे ४ वर्षांपासून पडझड झालेली भिंत पाडण्याची विनंती मालकाला केली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. घटनेच्यावेळी ती येथे नव्हती म्हणून निभावले. आमच्या घरांच्या केबल, व्हायरवर भिंत कोसळून नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
भारत नगर येथील घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पानटपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले. पाटील कुटुंबातील महेश पाटील हा तरुण शरीराने अपंग असून उदरनिर्वाहासाठी तो पान टपरी चालवतो. पान टपरीवरील पत्र्याचे नुकसान झाल्याने त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पाटील कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी तसेच महेश पाटील या अपंग तरुणाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments