कित्तूर तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांनी जमिनीवर शेतीचा हक्क मिळावा, या मागणीसाठी बेळगाव चालो या नावे भव्य ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आंदोलन छेडले. आपली मागणी मान्य न झाल्यास गुराढोरांना घेऊन संपूर्ण कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

कित्तूर येथील शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकऱ्यांनी बेळगावमधील कित्तूर चन्नम्मा सर्कल समोर धरणे आंदोलन छेडले. राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी कुलवळ्ळीसह आसपासच्या गावातील शेतकरी गुराढोरांसह आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बिष्टप्पा शिंदे या शेतकऱ्याने बोलताना सांगितले कि, कित्येक पिढ्यांपासून आम्ही या ९ गावात राहात आहोत. सिद्धरामय्या सरकारच्या काळातील तत्कालीन मंत्री कागोडू तिम्मप्पा यांनी या गावात भेट देऊन पाहणी केली. एडीएलआर आणि तहसीलदारांना बोलावून आदेश देत जमीन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बदललेल्या सरकारने या आदेशाची अम्मलबजावणी न करता त्यावर अंकुश आणला आहे. आम्हाला हक्कपत्रे न दिल्यास आपण गुराढोरांनाघेऊन संपूर्ण कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.
यानंतर वकील आणि शेतकरी आंदोलन बी एच निरलकेरी यांनी सांगितले कि, बगरहुकूम योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सादर केलेले १४००० हून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली असता पैशांची मागणी करण्यात येत आहे. २० दिवसांपूर्वी तहसीलदारांमार्फत सरकारदरबारी निवेदन सादर केले असून सध्या या जमिनी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत ९ गावातील शेतकऱ्यांसह आंदोलन छेदत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेकडो वर्षांपासून नांगरणी करत आलेल्या या जमिनीवर आपला हक्क सिद्ध करण्यासाठी सरकारदरबारी हक्कपत्र देण्याची मागणी करत आज कित्तूरमधील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले असून आता सरकार या आंदोलकांच्या मागणीला कसा प्रतिसाद देईल, हे पाहणे महत्वाचे आहे.


Recent Comments