वन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
मंत्री उमेश कत्ती यांना काल, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने उपचारांसाठी रामय्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अतिदख्त विभागात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारांचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला.
मंत्री उमेश कत्ती यांना यापूर्वीही दोनवेळा हृदयविकाराचे सौम्य झटके आले होते. काल रात्री बाथरूमला गेल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते कोसळून पडले. त्यांना तातडीने रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारांचा उपयोग न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बेळगाव जिल्ह्यावर तसेच राज्याच्या राजकीय पटलावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कत्ती यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून, तमाम सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे म्हटले आहे. बेंगळुरातील रामय्या इस्पितळाला भेट देऊन बोम्मई यांनी कत्ती यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याचवेळी कत्ती यांच्या निधनाबद्दल बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेजने आज बुधवारी सुटी देण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. कत्ती कुटुंबाशी आपला गेल्या ४ दशकांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे असे त्यांनी भावुक होऊन सांगितले. लहान वयात आमदार म्हणून निवडून येऊन त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. माझ्या वडिलांसोबतही त्यांच्या वडिलांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाने राज्याची अपार हानी झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री बोम्मई यांनी व्यक्त केली.
बुधवारी सकाळी विमानाने कत्ती यांचा पार्थिव देह संकेश्वरला नेण्यात येईल. तेथे हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या आवारात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल त्यानंतर बेल्लद बागेवाडी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.


Recent Comments