शेतात चरायला सोडलेल्या जनावरांपैकी बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील बाकनूर येथे घडली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात बैलाच्या गळ्याला आणि पायावर जखमा झाल्या आहेत. या घटनेने बाकनूर आणि परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
होय, गेल्या महिन्याभरापासून गोल्फ कोर्स परीसरात दडी मारून बेळगावकरांची झोप उडविलेल्या बिबट्याने तो परिसर सोडून अन्यत्र मोर्चा वळविल्याचा वनखात्याचा कयास आहे. टाळा पुष्टी देणाऱ्या घटना बेळगाव तालुक्यातील ग्रामीण परिसरात घडत आहेत. मंडोळी परीसरात बिबट्या दिसल्याचा बातम्या येतात न येतात तोच आता बाकनूर येथे बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना थोड्या उशिराने उघडकीस आली आहे.
शनिवारी बाकनूर येथील शेतकरी सातेरी नेमण्णा गोडसे यांनी एका बैलांसह आपली जनावरे चरण्यासाठी गावाजवळील गवळीवाडा शिवारात सोडली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यातील बैलावर हला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात बैलाच्या गळ्याजवळ आणि पायावर जखमा झाल्या आहेत.

या संदर्भात माहिती देताना बेळवट्टी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बाळू नारायण मजूकर यांनी सांगितले की, सातेरी गोडसे यांनी जनावरे चरण्यासाठी सोडली असता, वाघाने एका बैलावर हल्ला केला आहे. यात बैल गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने बाकनूर, बेळवट्टी परिसरात ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनखात्याने आणि प्रशासनाने या जंगली श्वापदांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे सातेरी गोडसे यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
बाकनूरचे युवा कार्यकर्ते मारुती सातेरी म्हणाले, वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे सातेरी गोडसे यांचे नुकसान झाल्याने सरकारने त्यांना योग्य भरपाई द्यावी. या परिसरात बिबटया, वाघासारख्या प्राण्यांच्या संचाराने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. दोन-तीन दिवसांपासून ग्रामस्थ घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे वनखात्याने आणि जिल्हा प्रशासनाने या प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बेळगावातून बिबट्या निघून गेल्याची शक्यता वनखाते व्यक्त करीत असले तरी शहरात अजूनही भीतीचे वातावरण आहेच. तशातच आता बिबट्याने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला का असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधी मंडोळी, नंतर इनाम बडस येथे बिबट्या दिसल्याचे वृत्त येऊन थडकते तोच आता बाकनूर येथे बिबट्याने बैलावर हल्ला करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक दहशतीखाली वावरत आहेत. जिल्हा प्रशासन आणि वनखात्याने त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.


Recent Comments