Belagavi

आमदारांच्या नाराजीवर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया!

Share

बेळगावमधील स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदारांना न बोलाविल्याने आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी प्रतिक्रिया दिली.

बेळगावमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर यावेळी त्यांनी प्रतिक्रियाही दिली.

बळ्ळारी नाल्यासंदर्भातील समस्येसंदर्भात शेतकरी आणि जनतेने माझ्या निदर्शनास हि बाब आणून दिली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. रेल्वे आणि विमानतळासंदर्भातील रस्त्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली. शेतकऱ्यांनी माझ्याकडे अर्जही केले असून या विषयावरदेखील आपण चर्चा केली, यात गैर असे काहीच नाही. शेतकरी आणि जनतेने आपल्या समस्या माझ्याकडे मांडल्या आणि जिल्हा पालकमंत्री या नात्याने मी त्या समस्यांवर चर्चा केली. या बैठकीला स्थानिक आमदारांना बोलाविण्यात आले नाही मात्र या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याबाबत मला विचारा… मी सांगण्यास तयार आहे. शिवाय स्थानिक आमदारांची बैठक अद्याप झाली नाही हि बैठक देखील होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शहरात बिबट्या शोध मोहीम सुरु असून यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, यापूर्वीच बिबट्या शोध मोहिमेवर मी प्रतिक्रिया दिली आहे. वनविभाग कसोशीने प्रयत्न करत असून आतापर्यंत ८ ठिकाणी सापळे रचण्यात आले आहेत. शोधमोहीम सुरु असून या मोहिमेत मुधोळ श्वानाचा वापर करायचा विचार सुरु आहे. लष्करात देखील आता मुधोळ श्वानाचा वापर होत असून या माध्यमातून बिबट्याचा शोध लागेल, असे जिल्हा पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

म्हादईप्रश्नी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले, महादजीचे ३.९ टीएमसी पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध झाले आहे.. केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी याआधीच प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले सरकार म्हादईप्रश्नी केवळ आश्वासनेच देत नसून यासाठी अर्थसंकलपात देखील तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. यापूर्वीच्या सरकारच्या काळात केवळ भाषणबाजी करण्यात आली मात्र आपले सरकार म्हादईप्रश्नी गांभीर्याने काम करत असून याप्रकरणी कोणाचाही आक्षेप नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ()

Tags: