केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविलेल्या “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुकारलेले “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करण्यासाठी बेळगाव महानगरपालिका गेल्या आठवडाभरापासून कार्यरत आहे. शहरातील सर्व वॉर्डांमध्ये फिरून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेचे कर्मचारी तसेच कन्नड व मराठी शाळेतील मुलांनी आज, रविवारी शहरातील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकापासून तिरंगा रॅली काढली.

रॅलीत शाळकरी मुलांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणा दिल्या. यावेळी महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, नगरसेवक संतोष पेडणेकर, जयतीर्थ सवदत्ती यांच्यासह अनेक शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी मारुती गल्ली, कलमठ रोड, कुलकर्णी गल्ली, शेरीगल्ली मार्गे फिरून टिळक चौकात तिरंगा रॅलीची सांगता झाली. रॅलीत तिरंगा ध्वज आणि फुगे तसेच फुलांच्या मळणी सजविलेली वाहने सहभागी झाली. शहरातील मराठी, कन्नड व उर्दू सरकारी शाळांचे विध्यार्थी, मनपाचे पौरकार्मिक व कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विध्यार्थी-विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


Recent Comments