Belagavi

श्रीनगरमध्ये गटारीचे पाणी दवाखाना, मेडिकल दुकानात

Share

बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. श्रीनगरच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पावसाचे पाणी शिरले असून रूग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे.

पहावे तिकडे सर्वत्र लाल चिखलात मिसळलेले पाणी. रस्ता व गटारी नसल्याने पावसाचे पाणी शेजारील इमारतींमध्ये शिरत आहे. होय, ही सर्व दृश्ये स्मार्ट सिटी बेळगाव शहरातील. होय, बेळगावात मुसळधार पावसामुळे जनतेला मोठा त्रास होत आहे. रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये पाणी शिरले आणि अभूतपूर्व आपत्ती निर्माण झाली आहे. ही सर्व दृश्ये श्रीनगरच्या गार्डनजवळील डॉ. मुरुगेश पाटील दवाखान्याजवळील आहेत. शहरात पावसाचा जोर वाढल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये शिरले आहे. अशातच श्रीनगरमधील गार्डनशेजारी डॉ. मुरुगेश पाटील यांच्या चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये पाणी घुसून मोठा गोंधळ उडाला. दवाखाना आणि मेडिकल दुकानामध्ये पाणी शिरल्याने आणीबाणी निर्माण झाली आहे. दवाखान्यात सुमारे 6 इंच पाणी साचले असून या पाण्यात रुग्ण व डॉक्टरांना वावरावे लागत असल्याची परिस्थिती आहे. मेडिकल दुकानात पाणी शिरल्याने औषधे पाण्यावर तरंगत आहेत. दवाखाना आणि मेडिकल दुकानातील पाणी बाहेर काढण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी मोठी कसरत करत आहेत. आमच्या इन न्यूजशी बोलताना, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्मार्ट सिटी कंपनीविरोधात संताप व्यक्त केला. स्मार्ट सिटी योजनेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. पण आधी तुम्ही कोणत्या भागात कसे काम कराल याचे नियोजन करा. मग काम करा. यापूर्वी याठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था होती. मात्र स्मार्ट सिटीचे काम सुरू झाल्यानंतर ज्या ठिकाणी आधी पाणी वाहून जात होते ते अडवण्यात आले. त्यामुळे ही समस्या उदभवल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून येथील समस्या दूर करण्याची मागणी त्यांनी केली.

मेडिकल दुकानात पाणी घुसल्याने औषधे खराब झाली आहेत. मेडिकल दुकानासमोरील रस्त्यावरील पाणी ओसंडून वाहत असून सखल इमारतींमध्ये शिरले आहे. तसेच पाणी साचल्याने मेडिकल दुकानाचेही नुकसान झाले. कर्ज काढून औषधाचे दुकान काढले. मात्र आता पावसाचे पाणी साचल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची कैफियत त्यांनी मांडली. त्याच वेळी, ज्या दुकानदारांनी आमच्या इन न्यूज आपली मराठीशी बोलताना सांगितले की, पावसाचे पाणी बहुतेक गटारींमध्ये वाहून जाताना ओव्हरफ्लो होऊन शेजारच्या दुकानांमध्ये घुसते. आमच्या दुकानातील लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, स्टेशनरी साहित्य पावसाच्या पाण्याने खराब झाले आहे. दरवर्षी ही समस्या उदभवते. मात्र यावेळी ही समस्या वाढली आहे. आमदार अनिल बेनके यांनी यापूर्वीच या ठिकाणी भेट दिली आहे. त्यांनी या समस्येवर तोडगा काढल्यास बरे होईल, असे ते म्हणाले. बाइट

एकंदर बेळगावात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे एक-दोन नव्हे तर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे. पावसामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Tags: