Belagavi

अवजड वाहनांना नो एंट्रीच्या वेळेत होणार बदल

Share

बेळगावातील मध्यवर्ती भागात सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा नियम यापूर्वीच अस्तित्वात आहे. त्यात बदल करून सकाळी 7.30 किंवा 8 ते 11 असा बदल करावा  लागेल. याबाबतचा अहवाल मागवून लवकरच आदेश काढणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी दिली.

बेळगावात गेल्या दोन दिवसांत दोन विद्यार्थ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याबाबत पत्रकारांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, अवजड वाहनांच्या धडकेत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काही मार्गदर्शक तत्त्वे आधीच अस्तित्वात आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 9 ते 11 तसेच दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहनांना येण्यापासून रोखण्यासाठी नियमावली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. गरज पडल्यास वेळ तपासून नो एन्ट्रीच्या वेळेत बदल करू, असे त्यांनी सांगितले.

बेळगावात 100 हून अधिक शाळा आहेत आणि त्या सर्व ठिकाणी पोलीस कर्मचारी ठेवणे कठीण आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालय व्यवस्थापन मंडळासह डीडीपीआय आणि शिक्षण विभागासमवेत बैठक घेऊन कार्यवाही करू. यासंदर्भात आम्ही विशेष मोहीम सुरू करणार आहोत. अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीची वेळ बदलून बदलून सकाळी 7.30 किंवा  8 ते 11 या वेळेत बंदी करावी लागेल. याबाबतचा अहवाल मागवून निर्णय घेऊ. खानापूर रोड ते तिसरे गेट, कॅम्प, गोवावेस प्रदेशात सकाळी खूप गर्दी होते. काही प्रसंगी शिक्षकच मुलांना घेऊन रस्ता ओलांडताना आम्ही पाहिले आहे. शाळा व्यवस्थापनानी आम्हाला हातभार लावावा असे आवाहन शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी केले.

एकंदर दोन जीवघेण्या अपघातानंतर बेळगाव पोलीस खडबडून जागे झाले आहेत. विध्यार्थी सुरक्षेसाठी ते आता  कडक उपाययोजना करत आहेत. जर हे आधीच केले असते तर दोन निष्पाप जीवांचे नुकसान टाळता आले असते अशी भावना शहरवासियांत आहे.

Tags: