Belagavi

‘बीम्स’ प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह ! बाळाच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर कुटुंबीयांचा आक्रोश

Share

बेळगाव जिल्हा रुग्णालयात एका बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. या घटनेनंतर पुन्हा बीम्स प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बेळगाव जिल्हा रुग्णालयासंदर्भात एकीकडे सकारात्मक बातम्या पुढे येत असून दुसरीकडे पुन्हा समस्या आणि गैरसोयीच्या बातम्याही पुढे येत आहेत. नुकत्याच एका बाळाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची बाब पुढे आली असून सदर घटनेनंतर नातेवाईकांनी याला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत जिल्हा रुग्णालयासमोर आक्रोश व्यक्त केला आहे.

होन्नीहाळ या गावातील रहिवासी सुनीता नामक महिला गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. पोटदुखी वाढल्याने सदर महिलेची प्रसूती सिझेरियन पद्धतीने करण्याची मागणी नातेवाईकांनी केली मात्र याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना कारणीभूत ठरवत आपले मूल परत करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला आहे. हृदयाचे ठोके कमी झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र यासाठी डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा कारणीभूत असल्याचे सांगत कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली.

यावेळी आपली मराठीला प्रतिक्रिया देताना मृत बालकाच्या पालकांनी सांगितले, गेल्या ८ दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी आपण जिल्हा रुग्णालयात दाखल झालो होतो. आज – उद्या अशी करणे देत, नैसर्गिक पद्धतीने प्रसूती करण्याचे सांगण्यात आले. त्रास वाढल्याने सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्याची विनंती करूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले त्यामुळे आपले मूल गमवावे लागले, असे दुःख पालकांनी व्यक्त केले.

याचसंदर्भात आणखी एका पालकाने सांगितले कि, जिल्हा रुग्णालयात स्कॅनिंग सुविधा उपलब्ध नाही. बाहेरून स्कॅनिंग करून येथे यावे लागते. रुग्णालयातील वैद्याधिकारी योग्यपद्धतीने तपासणी आणि उपचार करत नाहीत. जिल्हा रुग्णालयात अधिक शिकाऊ डॉक्टर आहेत, अशा कारणामुळे आज मूल दगावले आहे. नैसर्गिक प्रसुतीचे कारण देत ८ दिवस वेळ काढून ऐन गरजेवेळी डॉक्टरांनी दुर्लक्ष केले यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यासंदर्भात वैद्याधिकारी अण्णासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया सदर आरोप फेटाळून लावत बाळाच्या मृत्यूला वैद्यकीय कारण असून वैद्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हि बाब झाली नसल्याचे सांगितले.

यासंदर्भात इन्चार्ज डॉक्टरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, सदर महिलेची नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होण्याची शक्यता अधिक होती. यासाठी आपण प्रयत्नदेखील केले. याच दृष्टिकोनातून उपचार देखील करण्यात आले. मात्र शेवटच्या वेळी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. यापूर्वीही या महिलेची तीनवेळा सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली असल्याने काही त्रुटी देखील होत्या, तसेच बाळाच्या हृदयाचे ठोकेही कमी असल्यामुळे सिझेरियन झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. यात डॉक्टरांचा कोणताही निष्काळजीपणा कारणीभूत नसून यासंदर्भात कोणत्याही चौकशीसाठी आपण तयार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

https://youtu.be/_KaTLUnDtOA

बीम्सची प्रतिमा सुधारत असल्याचे चित्र एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला गेल्या आठवड्याभरात आलेली हि दुसरी तक्रार आहे. आज झालेल्या बाळाच्या मृत्यूनंतर पालकांचे आरोप तर दुसऱ्या बाजूला आपली यात कोणतीही चूक नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे.. हि सारी परिस्थिती पाहता यात एका बाळाचा नाहक मृत्यू झाला असून या घटनेमुळे हळहळ देखील व्यक्त होत आहे. बीम्सची प्रतिमा संपूर्णपणे सुधारून नागरिकांच्या योग्य सेवेत बीम्स प्रशासन उतरावे अशीही आशा आता नागरीकातून व्यक्त होत आहे.

Tags: