Banglore

न्यायाधीशांना खुनाची धमकी देणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू : मुख्यमंत्री

Share

हिजाब याचिकेवर निकाल देणाऱ्या आमच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशांना हत्येची धमकी देणाऱ्या देशद्रोह्यांना चांगलाच धडा शिकवू असा कडक इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला. त्या आरोपीना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश आमच्या पोलिसांना दिले आहेत असेही त्यांनी सांगितले

बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानी रविवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, काही देशद्रोह्यांनी या देशाच्या व्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. न्यायालयाचा निकाल सर्वानीच मान्य करावा लागतो. निकालाला वरच्या न्यायालयात आव्हान देता येते. धमकी देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. व्यवस्थेवरच घाव घालण्याचा हा प्रकार आहे. तो उखडून टाकला पाहिजे. मी आमच्या पोलिसांना सूचना दिल्या आहेत. आरोपीना आमच्या राज्याच्या ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असे बोम्मई म्हणाले.

ज्या-ज्या कलमांखाली गुन्हे दाखल करता येतील ती-ती कलमे लावण्यास पोलिसांना सांगितले आहे असे सांगून मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, न्यायाधीशांना वाय कॅटेगरीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीशांना धमकी देऊन ३ दिवस लोटले तरी धर्मनिरपेक्षतावादी मौन पाळून आहेत अशी टीका त्यांनी केली. आरोपींवर सरकार कठोर कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला.

खासगी बसमध्ये अधिक संख्येने प्रवासी घेतले जातात यावर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, याबाबत नियम-कायदे आहेत. तरीही सरकारची नजर चुकवून नियम मोडून बेसुमार प्रवाशांची वाहतूक केली जातेय. त्यामुळे याबाबतचा कायदा आणखी कठोर केला जाईल. नियम मोडल्यास लायसन्स रद्द करण्यात येईल. पावगड दुर्घटनेतील जखमींवर योग्य उपचार करण्यात येत आहेत. यात खूप लोक जखमी झाले आहेत. गरज पडल्यास बेंगळूरला उपचारांची सोया करण्याचे निर्देश दिले आहेत असे बोम्मई म्हणाले.

एकंदर न्यायाधीशांना हत्येची धमकी दिल्याची बाब मुख्यमंत्र्यानी गांभीर्याने घेतली आहे. लवकरच आरोपीना बेड्या ठोकण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Tags: