राज्यात सध्या हिजाब वर्सेस केसरी वादाला नवे वळण लागले असून राजकीय दृष्टिकोनासहित आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या वादाला वेगळेच वळण दिले आहे. विजापूरमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केशरी पोशाख परिधान केल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने एक दिवस रजा दिली आहे.

विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील दोन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केशरी पोषाख परिधान केल्याने महाविद्यालयीन प्रशासनाने महाविद्यालयाला रजा जाहीर केली आहे. शांतेश्वर पीयूसी कॉलेज, गु. रा. गांधी कला, वाय ए पाटील वाणिज्य आणि मा. पु. जोशी विज्ञान पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज केशरी रंगाचे पोशाख परिधान करून महाविद्यालयात हजेरी लावली. दरम्यान यानंतर कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतेश्वर पदवी महाविद्यालयीन प्रशासनाने महाविद्यालयाला रजा जाहीर करत उद्यापासून सरकारी नियमानुसार गणवेश सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज २० हुन अधिक विद्यार्थी केशरी रंगाच्या पोशाखात आले होते. दरम्यान सदर विद्यार्थी क्लासमध्ये हजर राहण्यासाठी गेले असता प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना बाहेर घालवून महाविद्यालयाला सुटी असल्याचे घोषित केले. या साऱ्या प्रकारासंदर्भात प्रिन्सिपल बी एन राठोड यांनी माहिती दिली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांकडून जय श्रीराम चा नारा देण्यात आला. यावेळी एका मागोमाग एक असे शेकडो विद्यार्थी महाविद्यालय परिसरात केशरी रंगाच्या पोशाखासहीत दाखल झाले. यावेळी इंडी पोलिसांचीही आगमन झाले. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना विद्यार्थ्यांनी हिजाब वर्सेस केसरी संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदविली असून हिजाब परिधान करणाऱ्यांसाठी एक न्याय आणि आपल्यासाठी एक न्याय का? असा सवाल उपस्थित केला. 
हिजाब परिधान करण्यावरून सुरु झालेला वाद राजकारणाप्रमाणेच आता जनसामान्य तरुणांमध्ये पोहोचत आहे. आज विजापूर मध्ये झालेल्या प्रकारानंतर पुन्हा वातावरण तापले असून यासंदर्भात हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार असून अनेकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.


Recent Comments