Vijayapura

सिंदगी आणि हानगलमध्ये भाजपचा विजय निश्चित : मंत्री सी. सी. पाटील

Share

राज्यात होत असलेल्या सिंदगी आणि हानगल या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी व्यक्त केला.

मंगळवारी विजापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री सी. सी. पाटील म्हणाले, सिंदगीत पक्षाचा उमेदवार किमान २५ हजारहून अधिक मताधिक्क्याने विजयी होईल यात शंका नाही. केंद्र आणि राज्य सरकारने केलेली लोकविकासाची कामे पाहता मतदार आम्हाला नक्की आशीर्वाद देतील.

राज्यातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीवरून उच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील रस्ते खराब झाले आहेत हे खरे आहे. लवकरच रस्ते दुरुस्ती कार्य हाती घेण्यात येईल. लिंगायत पंचमसाली समुदायाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत, आमचे सरकार सकारात्मक आहे, यात कसले राजकारण नाही असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीला तत्व, सिद्धांताच्या आधारे सामोरे गेले पाहिजे. वैयक्तिक टीकाटिपणीवर नव्हे असे त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या विधानांबाबत सांगितले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी उपस्थित होते.

 

 

 

Tags: