शरीराला आवश्यक तत्वांनी समृद्ध असलेल्या ड्रॅगन फ्रूटची आज जगभरात चांगलीच चलती आहे. पण त्यामुळेच ड्रॅगन फ्रूटची नकली रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. मात्र विजापूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने अशी फसवणूक टाळण्यासाठी स्वतःच्याच शेतात मार्गदर्शन करण्यासह मोफत रोपे देण्याचा उपक्रम चालविला आहे. कोण आहे हा देवदूत? चला पाहुयात हा रिपोर्ट …!

होय, या हिरव्यागार रोपांवर दिसणारे हे फळ आहे ड्रॅगन फ्रुट. दुष्काळपीडित विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी तालुक्यातील इंगळगी गावातील सदानंद हुग्गी या शेतकऱ्याने आपल्या २४ एकरपैकी ४ एकर शेत खास या ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी राखून ठेवले आहे. येथे ते लाल आणि पांढऱ्या रंगाची ड्रॅगन फ्रुट पिकवतात. यंदा त्यांना याचे उत्पादनही चांगले मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबातील इतरांनी उद्याग-धंद्यात चांगले यश मिळवले असले तरी सदानंद हे आवडीच्या शेती क्षेत्राकडे वळले. थायलंड, व्हिएतनामसारख्या अनेक प्रदेशात भरपूर मागणी असलेल्या लालभडक ड्रॅगन फ्रूटचे विजापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात उत्पादन घेण्यात सदानंद हुग्गी यशस्वी झाले आहेत.

ते पिकविण्याचे मार्गही त्यांनी स्वतःच शोधले आहेत. याबाबत त्यांना चांगले ज्ञान असल्याने शेजारच्या आंध्र प्रदेश, तमिळनाडूसारख्या राज्यातून शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. ड्रॅगन फ्रुटला सोन्याहून चांगला भाव मिळत असल्याचे कळताच शेतकरी त्याच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले. ही संधी साधून मग दलालांनी नकली किंवा चांगला उतारा न देणाऱ्या कमी दर्जाच्या ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची विक्री सुरु केली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ लागली. ती टाळण्यासाठी सदानंद यांनी स्वतःच्याच शेतात शेतकऱ्यांना लागवडीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मोफत देऊन लागवडीसाठी आपल्याच नर्सरीतील रोपेही देण्याचा उपक्रम सुरु केला. ड्रॅगन फ्रुटला अन्य फळझाडांच्या तुलनेत कमी मेहनत लागते. आठवड्यत २-३ वेळा पाणी आणि खत घालावे लागते. मात्र फसवणूक करणाऱ्या कंपन्या याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन न करता नफा कमावतात असे सदानंद हुग्गी यांचे म्हणणे आहे.
ड्रॅगन फ्रुट हे थायलंड, व्हिएतनाम सारख्या देशांत लोकप्रिय फळ आहे. स्टार हॉटेल्समध्येही कॉकटेल ज्यूस, फ्रुट सलाड साठी त्याला मोठी मागणी आहे. यात साखरेचा अंश कमी असतो. तर आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिनची मात्र भरपूर असल्याने ते आरोग्यवर्धक आहे. कीड अनिरोगांची बाधा या फळाला सहसा होतच नाही. १ किलो लाल ड्रॅगन फ्रुटला बाजारात २०० ते २५० रुपये दर हमखास मिळतो तर पांढऱ्या ड्रॅगन फ्रुटला १५० ते १७० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. ए बी सी ग्रेडपैकी ए ग्रेडचे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन सदानंद घेतात. याशिवाय रोज ऍप्पल, वॉटर रोज ऍप्पल अशा नावेही न ऐकलेल्या फळांची झाडे त्यांच्या शेतात आहेत. त्याशिवाय वनौषधी आणि भाजीपाल्याचे उत्पादन ते घेतात. ड्रॅगन फ्रुटीला अधिक मागणी असल्याने त्याचे उत्पादन घेण्याचा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात. शिवाय त्यासाठी बाजारपेठही उपलब्ध करून देतात. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीविषयी अधिक माहिती घ्यायची असल्यास त्यांच्याशी मो. क्र. ९८८०३१४००० वर संपर्क साधता येईल. बोगस कंपन्या आणि दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी स्वतःच आधुनिक शेती करून त्याचे मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा सदानंद हुग्गी यांचा हा उपक्रम आदर्शच म्हणावा लागेल. विजयकुमार सर्वदा, आपली मराठी, विजापूर.


Recent Comments