Belagavi

‘काळ आला होता, पण… छत आणि भिंत कोसळताना पळ काढल्याने वाचला दोघांचा जीव !

Share

काळ आला होता, पण वेळ आली नव्हतीया म्हणीची प्रचिती देणारी घटना बेळगाव तालुक्यातील अगसगा गावात घडली. समयसूचकतेमुळे दोघा भावांचा थोडक्यात जीव वाचला.

होय, देव तरी त्याला कोण मारी? असे म्हणतात. अशीच घटना बेळगाव तालुक्यातील अगसगा गावात घडली आहे. घराचे छत आणि भिंत कंसोलत असताना दोघा भावांनी समयसूचकता दाखवत घराबाहेर पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. बेळगाव जिल्ह्यात गेले काही दिवस ठिकठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे खासकरून ग्रामीण भागातील जुनी-जीर्ण घरे कोसळण्याच्या, घरांच्या भिंती पडण्याच्या घटना घडत आहेत.

बेळगाव तालुक्यातीलच बडालअंकलगी येथे सुमारे आठवड्याभरापूर्वीच घराचे छत आणि भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. अशीच घटना अगसगा गावातही घडली. परंतु त्यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. बाळू कडोलकर यांच्या घराची भिंत आणि छत कोसळले. यावेळी घरात बाळू आणि त्यांचा भाऊ बसवंत हे दोघेच घरात होते. त्यावेळी अचानक जोराचा आवाज होऊन घराचे छत मोडले आणि भिंत कोसळली. छत आणि भिंत कोसळताना झालेला आवाज ऐकून या दोघांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. ते घराबाहेर पडले आणि पापणी लवते न लवते तोच छत आणि भिंत कोसळली. मात्र दोघांनीही समयसूचकता दाखवत घराबाहेर पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र छत आणि भिंत कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

 

 

 

Tags: