खानापूरमध्ये झालेल्या अरबाज मुल्ला खूनप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम धर्मातील नेत्यांनी केली आहे.

यासंदर्भात बेळगावमधील मुस्लिम नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मौलाना सलीम आणि मुफ्ती मंजूर आलम यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. आपल्या देशात शांतता अबाधित राहणे गरजेचे आहे. परंतु काही समाजकंटकांकडून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घटनांमुळे समाजामध्ये अशांतता पसरते. सामाजिक आरोग्य बिघडते. यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
यावेळी महम्मद रफिक सय्यद यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदविली. समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न होत असून या संदर्भात दोषींवर संघटित निषेध कायद्यान्वये तक्रार दाखल करून, फाशीची शिक्षा द्यावी, असे आवाहन केले.
नगरसेवक अझीम पटवेगार म्हणाले, अशा पद्धतीचे अमानवी कृत्य करून कट रचून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोरातील कठोर शिक्षा देऊन कारवाई करावी.
या प्रकरणाचा तपस घेण्यात पोलिसांना यश आले असून आज दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. समाजात असे प्रकार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments