बेळगाव तालुक्यातील बडालअंकलगी येथे बुधवारी सायंकाळी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी गुरुवारी सकाळी भेट घेऊन त्यांना धीर देऊन सांत्वन केले.

होय, बडालअंकलगी येथे घर कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा तर समोरील घरातील एका बालिकेचा मिळून सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंसाधन मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी गुरुवारी सकाळी भेट घेऊन त्यांना धीर देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाईचा धनादेशही प्रदान केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, अमावास्येच्या दिवशी एका गरीब कुटुंबाचे घर कोसळून तब्बल ७ जणांचा बळी जाणे ही अत्यंत दुःखद घटना आहे. अशा घटनेत भरपाई दिली जाऊ शकते परंतु गेलेला जीव परत आणता येत नाही. राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रु तर पंतप्रधान मोदींच्या वतीने प्रत्येकी २ लाख रु भरपाई देण्यात येत आहे. बालकल्याण विभागातर्फे प्रत्येक ३ मृत बालकांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रु भरपाई देण्यात येईल. खनगावी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना घर बांधण्यासाठी अतिरिक्त ५ लाख रुची मदत शासनातर्फे देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील धोकादायक अवस्थेतील घरांचे सर्वेक्षण करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि जिप सीईओना देण्यात येईल. अशा घरातील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचना देण्यात येईल. पीडीओ आणि महसूल कर्मचाऱ्यांकडून असे संयुक्त सर्वेक्षण करण्यात येईल. उत्तर कर्नाटकात दगड आणि माती वापरून घरे बांधण्यात येतात. त्यामुळे जिव्हानी अधिक होते. त्यामुळे सिमेंटचा वापर करून घरे बांधण्यात यावीत यासाठी सरकार पावले उचलेल असे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जिप सीईओ दर्शन एच. व्ही., डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्यासह इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. एकंदर जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी म्हटल्याप्रमाणे अशा घटनांत भरपाई देता येते, मात्र गेलेला जीव परत आणता येत नाही हेच सत्य आहे. या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती विधात्याने द्यावी हीच आमची प्रार्थना.


Recent Comments