Belagavi

विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप

Share

 बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ३५, काँग्रेसने १० जागा जिंकल्या असून एमआयएमने जागा जिंकली आहे तसेच १२ जागांवर अपक्ष निवडून आले आहेत अशी माहिती जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली.

पालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, मतदान, मतमोजणी सर्व काही सुरळीत, शांततेत पार पडले आहे. त्यासाठी सर्व मतदारांचे आभार. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. फेर मतमोजणीसाठी ३ उमेदवारांनी अर्ज केले होते. पण ते विचारात घेतलेले नाहीत. आमच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय अंतिम आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर-उपमहापौर निवडीसंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, महापौर-उपमहापौर निवडीची तारीख निवडणूक अयोग्य जाहीर करेल. विधान परिषद सदस्य, खासदारही या निवडणुकीत मतदान करू शकतात. आणखी अधिक माहिती नंतर कळवू असे त्यांनी सांगितले.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करून विजयोत्सव साजरा करू नये असा आदेश दिला होता. परंतु अशावेळी लहानमोठा विजयोत्सव होतोच. दंगा-धोपा न करता विजयोत्सव साजरा केल्यास प्रश्न नाही. परंतु तो करून, इतरांना त्रास देऊन, दुसऱ्यावर हल्ला करून विजयोत्सव केल्यास अशांवर कठोर कारवाई करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी न अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: