Belagavi

माजी आमदारांच्या निवृत्तिवेतनाच्या खर्चाबाबत आरटीआय कार्यकर्त्यांचा सवाल

Share

करदात्यांच्या पैशांच्या वापरावर भिमाप्पा गडाद यांचा आक्षेप

माजी आमदारांच्या निवृत्तिवेतन आणि सुविधांवर २१० कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारला कष्टकरी वर्गाच्या मागण्यांसाठी आर्थिक बोजाचे कारण का द्यावे लागते, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते भिमाप्पा गडाद यांनी पत्रकार परिषदेत केला. या खर्चाविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील सुमारे ४२६ माजी आमदारांचे निवृत्तिवेतन, प्रवास भत्ते आणि इतर सुविधा तसेच निधन झालेल्या २६३ माजी आमदारांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या कौटुंबिक निवृत्तिवेतनावर गेल्या पाच वर्षांत सुमारे २१० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे गडाद यांनी सांगितले.

माजी आमदारांच्या पत्नीला कौटुंबिक निवृत्तिवेतनासह दातांची कवळी आणि श्रवणयंत्र यांसारख्या सुविधांवरही सरकारी निधी खर्च केला जातो. मात्र, शेतकरी, सरकारी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत असल्याची टीका त्यांनी केली.

जनतेच्या करातून जमा होणाऱ्या पैशांचा वापर जबाबदारीने करावा. कष्टकरी वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष करून माजी आमदारांच्या सुविधांवर खर्च करण्याच्या धोरणाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गडाद यांनी दिला.

Tags: