बेळगावात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी आणि कन्नड भाषा भगिनी असल्याचे सांगत महाराष्ट्र-कर्नाटकातील सलोख्याचे आवाहन केले. मात्र, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याऐवजी बंधुभावाचे भाष्य केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

बेळगावातील धर्मनाथ भवन येथे भाजपच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा’ या संमेलनात फडणवीस सहभागी झाले. सुमारे एक हजार प्रबुद्ध नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी कन्नड भाषेतून भाषणाला सुरुवात केली. मराठी आणि कन्नड भाषा भगिनी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक ही शेजारी राज्ये असल्याने दोन्ही भाषिकांमध्ये परस्पर आदर असल्याचे त्यांनी सांगितले. देशात संघटित पद्धतीने कथानक उभे करून व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.


मात्र, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत फडणवीस यांनी कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही. कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रश्नांवर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी बांधव पदरमोड करून महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतात आणि आपल्या व्यथा मांडतात. अशा परिस्थितीत सीमाभागात येऊन केवळ मराठी-कन्नड भाषा भगिनी असल्याचे सांगणे पुरेसे नाही. मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असताना फडणवीस यांनी केलेले भाष्य मराठी जनतेच्या अपेक्षांना छेद देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर सामर्थ्यशाली देश बनत असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या हातातील संविधानाच्या पुस्तकाच्या रंगाचा उल्लेख करत त्यांनी संविधानाविषयीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मागे ढकलल्याच्या घटनेचाही त्यांनी संदर्भ दिला.
महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचा विजय झाल्यानंतर काँग्रेस ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करते; मात्र कर्नाटकात विजय मिळाल्यावर ईव्हीएम योग्य असल्याचे सांगते, अशी टीका फडणवीस यांनी केली. तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचाही त्यांनी उल्लेख केला. एसआयआर प्रक्रियेबाबत काँग्रेसकडून गैरप्रचार होत असल्याचा आरोप करत, काँग्रेसच्या सत्ताकाळातही आठ वेळा एसआयआर झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग भाजपला मदत करत असेल, तर केरळमध्ये काँग्रेसचा विजय कसा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments