Khanapur

खानापुरात महामार्गावरील पुलावर कारचा अपघात; एअरबॅगमुळे चौघांचे प्राण वाचले

Share

खानापूर येथील लोंढा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर ग्रँड विटारा कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, एअरबॅग उघडल्याने कारमधील चौघे गंभीर दुखापतीतून बचावले. चौघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

बेंगळुरू येथील चौघे गोव्याची सहल आटोपून आज सकाळी बेळगावच्या दिशेने निघाले होते. सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास खानापूर शहराजवळ नव्याने बांधलेल्या महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर हा अपघात झाला.

कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली असावी, असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

धडकेमुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. मात्र, एअरबॅग उघडल्याने चौघांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

वार्ताहर : अल्ताफ एम. बसरिकट्टी, इन न्यूज खानापूर

Tags: