बेळगावमध्ये २ डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौध येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सुवर्णसौध विद्युत रोषणाईने उजळले असून, बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासाची व्यवस्थाही अंतिम टप्प्यात आहे.

बेळगाव तालुक्यातील हलगा येथील सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, अधिवेशनाच्या स्वागतासाठी सुवर्णसौध सज्ज झाले आहे.


अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या निवासासाठी हलगा येथील भीमसेन पावले मैदानाशेजारील मोकळ्या जागेत चार भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. पोलिसांच्या विश्रांतीसाठी खाट, अंथरूण, पांघरूण आणि उशांची व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीच्या पार्श्वभूमीवर गरम पाण्याच्या स्नानासाठी मोठे बॉयलर बसवण्यात आले आहेत. तसेच भोजन आणि पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणीचे कामही सुरू आहे.

दुसरीकडे, अधिवेशनाच्या काळात विविध मागण्यांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून संघटना आणि आंदोलक बेळगावमध्ये येणार आहेत. त्यांच्या आंदोलनासाठी हलगा-मच्छे बायपासजवळ मोठा मंडप उभारण्यात आला आहे. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर उतरून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या निवासाची व्यवस्था, आंदोलनस्थळांची उभारणी आणि सुरक्षा व्यवस्थेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.


Recent Comments