Belagavi

बेळगावचे पोलीस अधिकारी संगमेश अण्णी यांची ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कामगिरी

Share

पोलीस दलातील कर्तव्याचा व्याप सांभाळत बेळगावचे राखीव उपनिरीक्षक संगमेश अण्णी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मलेशियातील लंकावी येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी १४ तास ३० मिनिटांत २२६ किलोमीटरचे अंतर पार केले.

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात राखीव उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संगमेश अण्णी यांनी या स्पर्धेत अरबी समुद्रात ३.८ किलोमीटर पोहणे, डोंगराळ भागात १८० किलोमीटर सायकलिंग आणि कडक उन्हात व दमट हवामानात ४२ किलोमीटर धावणे अशी सलग आव्हाने पूर्ण केली. आशियातील अत्यंत कठीण स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील सर्व टप्पे त्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केले.

पोलीस दलातील नियमित कामकाज, रात्रपाळी आणि बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतानाही त्यांनी सरावात खंड पडू दिला नाही. दररोज पहाटे चार वाजता पोहण्याचा सराव, कामावर जाण्यापूर्वी सायकलिंग आणि संध्याकाळी धावण्याचा सराव अशी त्यांची दिनचर्या होती. सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली. त्यांच्या यशामुळे बेळगाव पोलीस दलासह शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Tags: