Belagavi

बेळगावात संविधान समर्पण दिन उत्साहात साजरा

Share

बेळगावात संविधान दिनानिमित्त संविधान समर्पण दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी संविधानातील हक्क, समानता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत विचार मांडले.

बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ आणि विविध दलित संघटनांच्या पुढाकाराने संविधान समर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., समाजकल्याण विभागाचे सहसंचालक रामनगौड कन्नोळी यांच्यासह मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान केवळ एका जातीचे किंवा वर्गाचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे. शिक्षण, आरोग्य, धर्म, भाषा आणि आरक्षण यांसारख्या हक्कांमुळे नागरिकांना प्रगतीची संधी मिळाली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता दररोज त्यांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच उत्तम नागरिक बनून संविधानाची मूल्ये पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष तथा केएसआयआयडीसीचे राज्य संचालक मल्लेश चौगुले यांनी संविधानाची उद्दिष्टे केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणली पाहिजेत, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मल्लेश चौगुले, संदीप कोळकर, महादेव तळवार, दुर्गेश मैत्री, आनंद कांबळे, सुधीर चौगुले, गणेश शंगण्णावर, सिद्रार्य मैत्री, रवी कोळकर, शेखर कोळकर, विजय गोजगेकर, प्रकाश चंपन्नवर, विनोद सोलापूरे आणि साक्षी दरेन्नवर यांच्यासह समाजकल्याण विभागाचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी संविधानाचे संरक्षण आणि सामाजिक समानतेचा संकल्प करण्यात आला.

Tags: