बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विणकरांनी आंदोलनाची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर रोजी सुवर्णसौधसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाने दिली.

व्यावसायिक विणकरांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. हातमाग आणि वस्त्रोद्योग विकास विभागाला किमान १,५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, विभागातील रिक्त असलेली ५५ पदे तातडीने भरावीत आणि सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील विणकरांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विणकरांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


विणकरांना बांधकाम कामगारांच्या धर्तीवर सुविधा आणि ओळखपत्रे द्यावीत, सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांमधील संपूर्ण कर्जमाफी करावी, तसेच ५५ वर्षांवरील विणकरांना दरमहा किमान ५ हजार रुपये पेन्शन सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या विणकरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई द्यावी, ‘विणकर सन्मान’ योजनेची रक्कम १० हजार रुपये करावी, तसेच शून्य व्याजदराच्या कर्जाची मर्यादा २ लाखांवरून ५ लाख रुपये करून त्याला जीएसटीमधून सूट द्यावी, अशा मागण्यांचाही समावेश आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यावेळी चेतन मानवी, बसवराज जमखंडी, गंगाप्पा वंटगुडी, संगप्पा उदगट्टी, राजेंद्र मिर्जी यांच्यासह विणकर संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments