Belagavi

आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर आवश्यक, मात्र डॉक्टरांच्या अनुभवाला पर्याय नाही

Share

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक असला, तरी डॉक्टरांचे ज्ञान आणि अनुभव यांना त्याची जागा घेता येणार नाही, असे मत केएलई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रात आयोजित एआय आरोग्य शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेतील गुंतागुंतीच्या प्रक्रिया सुलभ होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. मात्र, चांगले परिणाम मिळवण्यासाठी वैद्यकीय माहिती अचूक, पडताळलेली आणि विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एआयचा वापर करताना डॉक्टरांचे वैद्यकीय ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि निर्णयक्षमता दुर्लक्षित करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद यांनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि डिजिटल आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी केएलई संस्थेची बांधिलकी असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच रुग्णांची सुरक्षितता आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

परिषदेत स्टार हॉस्पिटल्सचे राजेंद्र क्षीरसागर यांनी डिजिटल आरोग्य मानकांवर, तर नुवर्टचे संस्थापक नितीन गुप्ता यांनी रुग्णालयांमधील एआय तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीवर मार्गदर्शन केले. तसेच कृष्णवेणी यांनी डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याविषयी माहिती दिली. लावण्या कनगराज, सुंदर अरुमुगम, सुनील बेळूर आणि डॉ. अनिल मल्लेशप्पा यांनी आरोग्य क्षेत्रातील एआयचा सद्यस्थितीतील वापर आणि भविष्यातील वाटचाल यावर विचार मांडले.

कार्यक्रमाला जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पवार, केएलई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी आणि रुग्णालयाचे क्लिनिकल सर्व्हिसेस संचालक डॉ. माधव प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयाचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख रवी संकेश्वर यांनी आभार मानले. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, हुबळी आणि बेळगाव येथील रुग्णालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक आणि आयटी तज्ज्ञ अशा १५० हून अधिक प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला.

Tags: