Chikkodi

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांनी नियम पाळावेत : डीवायएसपी

Share

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच चिक्कोडी आणि निपाणी परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे अपघात वाढले आहेत. अपघात टाळण्यासाठी शेतकरी आणि चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर यांनी केले.

चिक्कोडी आणि निपाणी परिसरात अलीकडे ट्रॅक्टरशी संबंधित ७ ते ८ अपघातांची नोंद झाली आहे. रस्त्याच्या कडेला एक ट्रेलर उभा करून दुसरा ट्रेलर आणण्यासाठी गेल्यानंतर उभा असलेला ट्रेलर न दिसल्याने दुचाकीस्वार मागून धडक देत आहेत. अशा अपघातांत काहींना प्राण गमवावे लागले आहेत.

कारखान्यात ऊस उतरवून परतताना ट्रॅक्टर वेगाने चालवले जात आहेत. तसेच गतिरोधकांकडे दुर्लक्ष केल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून सदलगा परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे.

ट्रॅक्टरचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. वाहनासह चालकांचाही विमा उतरवावा. ट्रॅक्टरप्रमाणेच विनानोंदणी धावणाऱ्या ट्रेलरचीही नोंदणी करून घ्यावी. रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभे करू नयेत आणि वेगमर्यादेचे पालन करावे, अशा सूचना डीवायएसपींनी दिल्या.

शेतकरी आणि वाहनमालकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून जीवितहानी टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डीवायएसपी गोपालकृष्ण गौड यांनी केले.

Tags: