Belagavi

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दक्षिण विभाग अव्वल

Share

बेळगावात झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दक्षिण विभागाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १०५ पदकांसह प्रथम क्रमांक पटकावला. उत्तर विभागाने ५५, तर मध्य विभागाने ३१ पदके मिळवली.

बेळगावातील बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेच्या अंतिम दिवशी दक्षिण विभागाच्या स्केटर्सनी १०५ पदकांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले. उत्तर विभागाने ५५ पदकांसह द्वितीय, तर मध्य विभागाने ३१ पदकांसह तृतीय क्रमांक मिळवला. आंतरराष्ट्रीय विभागाला केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. प्रेमानंद जाधव, आलोक त्रिपाठी, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह स्केटर्स आणि पालक उपस्थित होते.

स्पर्धेत अबीर आहुजा, ईशा शर्मा, धुर्वा अरविंद, स्वरा साळुंखे, निरान राज एन, भव्या सिंग, दीपिता बी, प्रिजेश आणि भव्या बजाज यांनी सुवर्णपदके मिळवली. तर चिरा विनविक, बी. श्री साई महिता, अभिनव विमल, पृथ्वीका, आरव रावत, कशिश सिंग, शाणू मन्नू, त्रिशा, भावित बजाज आणि मधुमिता व्ही. यांनी रौप्यपदके पटकावली. रेयांश कुलकर्णी, यालिनी चिटिबाबू, श्रेवंत भूपती, ओविया, क्षितिज सिंग, निदरसना एस. पी., उत्कर्ष कणसारा, अन्वी वर्मा, त्रिशांक शंकर आणि अर्ना भटनागर यांनी कांस्यपदकांची कमाई केली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य ताळेकर तसेच बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: