State

बसवण्णांच्या विचारांविरोधातील वादग्रस्त पुस्तकावर सरकारची कारवाई

Share

संत बसवेश्वर यांच्या विचारांशी संबंधित वादग्रस्त पुस्तक जप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिलाय.

संत बसवेश्वरांच्या तत्त्वांचा आणि आदर्शांचा सरकार अवलंब करत असून, समाजात जातींमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला. रवी हंज यांच्या वादग्रस्त पुस्तकासंदर्भात मंत्री ईश्वर खंड्रे, एम. बी. पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आणि बसव समितीने निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार वादग्रस्त पुस्तक जप्त करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावर राज्याच्या हिताचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. अन्य पक्षांच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. कावेरी नदीच्या पाणीवाटपाबाबत बोलताना त्यांनी तामिळनाडूने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याचा उल्लेख केला. राज्यात सध्या पिण्याच्या पाण्याचीच तीव्र टंचाई असून, यंदा जलाशयांना बागीन अर्पण करण्याइतकीही परिस्थिती अनुकूल नाही. राज्यात पुरेसे पाणी असते तर निश्चितच शेजारील राज्याला दिले असते; मात्र सध्याची वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. राज्य आणि शेतकऱ्यांचे हित जपणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृष्णा निवासस्थानी महिला आणि आशा कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आपण राज्यातील सर्व २२४ विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत असून, कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नाही. काल गंगा निवासस्थानी सुमारे ५०० ते ६०० जणांना निमंत्रित करून विविध विषयांवर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. जेडीएस आणि अमित शहा यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळत, इतर पक्षांच्या अंतर्गत विषयांवर आपण भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: