Bailahongala

बैैलहोंगलमध्ये पुरुषांसाठी स्वतंत्र बसच्या मागणीसाठी आंदोलन

Share

शक्ती योजनेमुळे बसमध्ये गर्दी वाढून पुरुष प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्याचा आरोप करत बैलहोंगलमध्ये स्वतंत्र बससेवेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. पुरुष प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासह वाढत्या महागाईच्या विरोधातही आंदोलकांनी सरकारकडे मागणी केली.

कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महांतेश बढिगेर यांच्या नेतृत्वाखाली पुरुषांनी एकत्र येत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शक्ती योजना सुरू झाल्यापासून बसमध्ये गर्दी वाढली असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्या पुरुषांना बसमध्ये चढणे आणि आसन मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुरुष प्रवाशांसाठी स्वतंत्र बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत असल्याबद्दलही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. बसमधील गर्दी आणि महागाई या दोन्ही समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनानंतर बैलहोंगल तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. पुरुष प्रवाशांच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Tags: