Belagavi

आर. एल. लॉ कॉलेजमध्ये २० वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका

Share

बेळगावच्या राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात २० वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्यात आल्या असून, निवडून आलेल्या जिमखाना युनियन आणि विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात आशियाई पॅरा गेम्स २०२६ मधील कांस्यपदक विजेता पॅरा जलतरणपटू स्वातिक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालपणापासून जलतरणाचा सराव आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंतचा प्रवास सांगताना त्यांनी यशासाठी ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण मेहनत आणि दृढनिश्चय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आपल्या यशात आई-वडिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, पोलीस निरीक्षक आणि राष्ट्रपती पदक विजेते बी. आर. गड्डेकर यांनी विद्यार्थी निवडणुकांमुळे जबाबदारीची जाणीव, आत्मविश्वास आणि लोकशाही मूल्ये विकसित होतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांना आपले प्रश्न आणि विचार मांडण्यासाठी निवडणुका व्यासपीठ उपलब्ध करून देतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आर. एस. मुतालिक यांनी अध्यक्षीय भाषणात माजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा गौरव केला. विद्यार्थी निवडणुका भविष्यातील नेतृत्व घडविण्यासह निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. ए. एच. हवाळदार यांनी स्वागत करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीची माहिती दिली. जिमखाना युनियनच्या अध्यक्ष डॉ. समीना नाहिद बेग यांनी विद्यार्थी परिषद निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. सहायक शारीरिक शिक्षण संचालक अमित बी. जाधव यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: