बेळगाव-विजापूर राज्य महामार्गाचे काम सुरू असतानाच कागवाड शहरातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून याविरोधात मंगळवारी कन्नड समर्थक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी राणी चन्नम्मा चौकात रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विजापूर विभागाचे अधिकारी विवेक मठ आणि विजय पाटील यांनी आंदोलकांशी बोलताना, “अशी कितीतरी आंदोलने पाहिली आहेत. ही होतच राहतात. वर्तमानपत्रांत मोठ्या बातम्या प्रसिद्ध करा,” असे उपेक्षापूर्ण वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कागवाडमधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिका, जय कर्नाटक सेना, कित्तूर कर्नाटक सेना यांसह विविध कन्नड समर्थक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले. यावेळी कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मागण्या रास्त असल्याचे मान्य करताना रास्ता रोकोमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाती, पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, श्री रेणुकादेवी मंदिर प्राधिकरणाचे संचालक ज्योतिकुमार पाटील, ॲड. काका पाटील, राहुल कटगेरी, रमेश चौगुले, करवेचे अध्यक्ष सिद्धू वडेर, शिवानंद नवीनाळे, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, गणेश कोळेकर, फारुख अलास्कर, विनायक कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments