Bellary

बळ्ळारीत मोठा अनर्थ टळला; चालकाला चक्कर आल्याने बस व्यापारी संकुलात घुसली

Share

बळ्ळारी शहरात बसचालकाला अचानक चक्कर आल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यालगतच्या व्यापारी संकुलात घुसली. या अपघातात आठ दुचाकींचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बळ्ळारी शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर ही घटना घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या बसचालकाला अचानक चक्कर आल्याने बस अनियंत्रित होऊन संकुलाच्या दिशेने गेली. यावेळी संकुलासमोर पार्क केलेल्या आठ दुचाकींना बसने धडक दिली. धडकेनंतर बस दुकानात न घुसता तिथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. अस्वस्थ झालेल्या चालकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बळ्ळारीमधील ब्रूसपेट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags: