जमिनीच्या वादातून तडळगी येथे पिता-पुत्राची हत्या करण्यात आली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, पाच जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
काठी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ले करीत दोन कुटुंबांमध्ये संघर्ष झाला. या घटनेत हनुमंत सालोटगी आणि त्यांचा मुलगा मंजुनाथ सालोटगी यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.

तडळगी येथील हनुमव्वा मेटी यांच्या मालकीच्या सुमारे आठ एकर जमिनीवरून त्यांच्या नातेवाइकांसोबत वाद सुरू होता. गेल्या तीन वर्षांपासून हनुमव्वा यांनी ही जमीन हनुमंत सालोटगी आणि त्यांचा मुलगा मंजुनाथ यांना शेतीसाठी दिली होती. शुक्रवारी सकाळी पिता-पुत्र मजुरांसह ऊसतोडीसाठी शेतात गेले असता, दुसऱ्या गटातील लोकांनी त्यांना विरोध केला. ऊसतोड कशी करता, या प्रश्नावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत हाणामारीत रूपांतरित झाला. या हल्ल्यात पिता-पुत्राचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या प्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीयप्पा, रामप्पा, हनुमंत आणि केंचप्पा यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे काही व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल, अशी माहिती पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. कोल्हार पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जमिनीचा किंवा मालमत्तेचा वाद असला तरी हिंसा हा त्यावरील उपाय नाही. कायद्याच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याऐवजी हिंसेचा मार्ग स्वीकारल्यास त्यातून कुटुंबांचे नुकसान होते. मालमत्तेच्या वादातून जीव घेण्यापर्यंत मजल जाऊ नये, यासाठी समाजाने अशा घटनांमधून बोध घेण्याची गरज आहे.
विजयकुमार सारवाड इन न्यूज, विजापूर


Recent Comments