आमदार रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते अंकलगी आणि अक्कतंगेरहाळ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १२ कोटी १० लाख रुपयांच्या निधीतून बल्लारी नाल्यावर नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. तसेच मंजुरीच्या टप्प्यात असलेल्या ४ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून केईबी पुलाचे काम आणि अंकलगी जुन्या बसथांब्याजवळ आमदारांच्या २० लाख रुपयांच्या निधीतून श्री अडविसिद्धेश्वर पादगट्टे उभारण्यात येणार आहे.


पावसाळ्यात बल्लारी नाल्याला पूर आल्याने अडविसिद्धेश्वर मठाजवळील रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प होत होती. मठाजवळ आणि गड्डे पुलाजवळील तीन अरुंद पुलांमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांची उंची वाढविण्याची योजना हाती घेतल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. सर्व कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करावीत, अशी सूचनाही त्यांनी कंत्राटदारांना केली.

आपसातील मतभेद आणि द्वेष बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने विकासासाठी काम करावे. विकासासंदर्भातील मागण्यांना तत्काळ प्रतिसाद देऊ, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अडविसिद्धेश्वर मठाचे डॉ. अमरसिद्धेश्वर महास्वामीजी आणि मुनवळ्ळी सोमशेखर मठाचे मुरघेंद्र महास्वामीजी यांच्या हस्ते रमेश जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भीमगौडा पोलिसगौडर, भाजप मंडळाध्यक्ष राजेंद्र गौडप्पगोळ, टी. आर. कागल, मड्डेप्पा तोळिनवर, राजू तळवार, आनंद अत्तुगोळ, अण्णासाहेब राजमाने, रामण्णा सुंबळी तसेच अभियंते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments