Belagavi

टेंगिनकेरी गल्लीत ८ दिवसांपासून दिवसाढवळ्या सुरूच आहेत पथदिवे!

Share

शहरातील टेंगिनकेरी गल्लीत कॉर्नर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या परिसरातील तब्बल १५ ते २० विद्युत खांबांवरील पथदिवे दिवसा सुरूच राहत असल्याने विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

एकीकडे महानगरपालिकेकडून नागरिकांना वीज जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, दुसरीकडे महानगरपालिकेच्याच पथदिव्यांमधून अशा प्रकारे दिवसा वीज वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष गेलेले नाही का, असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक विजेचा अपव्यय रोखण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असताना पथदिव्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे? संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दिवसा सुरू राहणारे पथदिवे बंद करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांना वीज बचतीचे आवाहन करणाऱ्या महानगरपालिकेने आधी स्वतःच्या पथदिव्यांमधून होणारा विजेचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: