Belagavi

चुन्नाप्पा पुजारी यांच्या अटकेविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; हिरेबागेवाडी टोलनाका बंद

Share

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर धडक देत वाहतूक रोखली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे चुन्नाप्पा पुजारी यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याने शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी टोलनाक्यावर प्रवेश करून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदोबस्तावरील पोलिसांनी टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. हिरेबागेवाडीतील प्रमुख बसवेश्वर चौकात मोठ्या संख्येने जमून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. चुन्नाप्पा पुजारी यांच्यासह अटक केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर हिरेबागेवाडी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Tags: