State

कर्नाटकात सरकारी बस प्रवास महागला; आज मध्यरात्रीपासून नवे दर

Share

दूध दरवाढीनंतर आता कर्नाटकात सरकारी बस प्रवासही महागणार आहे. राज्यातील परिवहन महामंडळांनी बस तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

वायव्य कर्नाटक, कल्याण कर्नाटक आणि केएसआरटीसीच्या बस भाड्यात २३ टक्के, तर बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या बस भाड्यात ३५ टक्के वाढ करण्यात आली आहे.या निर्णयामुळे प्रवाशांना किमान ४ ते १८ रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री बैरती सुरेश यांनी दरवाढीची कारणे स्पष्ट केली. डिझेलच्या किमतीतील वाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे वाढलेला खर्च तसेच महामंडळांवरील कर्जाचा आणि आर्थिक दायित्वांचा वाढता बोजा यामुळे भाडेवाढ आवश्यक झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत बीएमटीसीच्या दरात एकदा, तर अन्य तीन महामंडळांच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. महामंडळांचा तोटा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बैरती सुरेश यांनी स्पष्ट केले.

सध्या चारही परिवहन महामंडळांकडे २५ हजार १२५ बस असून, त्यावर सुमारे १.३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण २४ हजार १७९ मार्गांवर बससेवा सुरू असून, दररोज सुमारे १.२४ लाख प्रवासी प्रवास करतात. शक्ती योजनेनंतर दररोज ७४ लाख महिला मोफत प्रवास करत असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.

शक्ती योजनेमुळे महामंडळांना तोटा होत असल्याचा दावा चुकीचा असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. मोफत प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तिकिटापोटी सरकारकडून महामंडळांना अनुदान दिले जाते. त्यामुळे आर्थिक तोट्याला शक्ती योजना जबाबदार नसून, डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२३ मध्ये एम. आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाच्या अभ्यासासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यानंतर अतुल कुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने चारही परिवहन महामंडळांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून राज्य सरकारला अहवाल सादर केला. डिझेलच्या किमतीतील वाढीनुसार वेळोवेळी बस भाड्याचे पुनर्निर्धारण करणे आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री बैरती सुरेश यांनी सांगितले.

Tags: