पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नातेवाइकांकडून २.६८ कोटी रुपये गोळा केले आणि त्यानंतर कट रचून त्याच रकमेची लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाच्यासह सात जणांना अटक करण्यात आली असून २.३९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

मूडलगी तालुक्यातील संगणकेरी येथील चिदानंद सिद्धारूढ कुरबेट याने एक लाख रुपये दिल्यास एक लाख ३० हजार रुपये परत देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मामा चन्नबसप्पा आणि तक्रारदारांनी मिळून २.६८ कोटी रुपये गोळा केले होते. मात्र, ही रक्कम लुटण्याचा कट चिदानंदनेच आखला होता.


३० ऑक्टोबर रोजी बीरप्पा वनसन्नी यांच्या शेडमध्ये ही रक्कम आणण्यात आली. पैसे मोजत असताना रात्री ११.४५ वाजता संजू अरभावी, राजाराम माळ्यागोळ, रमेश माळ्यागोळ, विठ्ठल माळ्यागोळ, प्रकाश मेळवणकी, राघवेंद्र कोप्पद, रामाप्पा तळवार आणि मारुती अरभावी यांनी शेडमध्ये प्रवेश केला. त्यांनी चिदानंदच्या मामाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोरीने मारहाण केली आणि पाच बॅगांमधील पैसे घेऊन पलायन केले.

मूडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी आणि गोकाकचे डीवायएसपी रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पोलीस निरीक्षक शैलेश बैकोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चिदानंदसह सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोकड, दोन दुचाकी आणि एक कार जप्त करण्यात आली. आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
या प्रकरणात रजेवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची भूमिकाही समोर आली असून पोलीसप्रमुखांनी त्याची चौकशी केली आहे. या घटनेशी कोणत्याही आमदाराचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही केले आहे.


Recent Comments