ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बेळगावातील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेसमोर शेतकरी संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ हसिरू सेने आणि क्षेम विकास सेवा रयत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात येत आहे. ऊसाला प्रतिटन किमान ५,५०० रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. जिल्हा पालकमंत्र्यांनी ३,५०० रुपये दर देण्याचे आश्वासन दिले असले, तरी सध्याचे कर्ज आणि शेतीचा खर्च पाहता हा दर पुरेसा नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. ऊस उत्पादकांच्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत सरकार आणि अधिकाऱ्यांकडून ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्यास एस. निजलिंगप्पा साखर संस्थेचे कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात येईल. तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी नेते सुरेश परगण्णवर यांनी दिला.
अखंड कर्नाटक रयत संघाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन चिन्नाप्पा हुंबी यांनी केंद्र व राज्य सरकार आणि साखर कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. बहुतांश साखर कारखाने काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या मालकीचे असल्याने या प्रश्नावर सर्वजण केवळ नाटक करीत असल्याचे ते म्हणाले. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. दर निश्चित न झाल्यास ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्याबरोबरच उद्यापासून आमदार आणि साखर कारखानदारांच्या घरांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही मल्लिकार्जुन चिन्नाप्पा हुंबी यांनी दिला.


Recent Comments